शालेय पोषण आहार अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस यांची कामे | शासन निर्णय व परिपत्रके | मध्यान्ह भोजन योजना | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
प्रस्तावना:-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य हिस्सा मिळून प्रति माह रु.२५००/- इतके मानधन देण्यात येते. प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील परिच्छेद ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते. प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे. सदर काम योजनेशी संबंधित कामकाजव्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरुन विनाकारण-विनाचौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढीलप्रमाणे कामकाज पार पाडावे.
1. शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विहीत वेळेत पोषण आहार शिजविण्याचे काम करणे.
ii. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
iii. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे.
iv. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे.
V. पोषण आहाराकरीता वापरण्यात आलेल्या भांड्याची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई /स्वच्छता करणे.
vi. पोषण आहाराकरीता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे.
vii. शाळास्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरीता सहकार्य करणे.
viii. अन्न शिजविताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे.
२. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. तदनंतर याबाबत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शासन निर्णय 18/12/2023 - डाऊनलोड करा
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे 08/01/2024 रोजीचे परिपत्रक
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याकरीता स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येत असते. स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत शासनाने दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे व त्याअनुषंगीक सर्व कामकाज संपल्यानंतरही शाळेमध्ये विनाकारण स्वयंपाकी तथा मदतनीस यांना थांबविण्यात येत असलेचावत तक्रार स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांनी संचालनालय तसेच शासनाकडे केलेल्या आहेत. प्रस्तुत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व शासनाने त्यासंदर्भात निर्गमित केलेल्या संदर्भिय परिपत्रकान्वये सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा ४ तास करण्यात येत आहे. सदर चार तासामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी त्यांना दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णयनुसार विहित करुन देण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. तद्नंतर त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेमध्ये थांबवून ठेवण्यात येवू नये.
स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामाच्या वेळेबाबत संचालक प्राथमिक यांचे परिपत्रक 08-01-2024 - डाऊनलोड करा
शालेय पोषण आहार योजनेचे पीएम पोषण- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (PM-POSHAN) असे नामकरण करणेबाबत शासन निर्णय 04/11/2022 - डाऊनलोड करा
स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ बाबत शासन निर्णय 09/02/2023 - डाउनलोड करा
--------------------------------------------
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती (SOP) जाहीर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: