सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता यु-डायस प्लस प्रणाली मधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. युडायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरीता विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणिकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे. या करीता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (बीट) व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येईल.
मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉगिनला फॉरवर्ड करण्यात आली आहे. यु-डायस प्लस कडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेली विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करुन केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक-शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट इ. सारखे विद्यार्थी संच मान्यते करीता फॉरवर्ड होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थी पैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फेरफडताळणीसाठी वर्ग करावेत.
गटशिक्षणाधिकारी यांनी फेरफडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्चः पडताळणी करून व नमूदविद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी. जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत, असे विद्यार्थी कमी करावेत. सदरची पडताळणी दिनांक १५.१२.२०२५ पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे.
राज्यस्तरावरुन राज्यात एकाचवेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणीअंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
शिक्षण संचालक.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, पुणे.

